सिंगापूर गणराज्याचे वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट
मुंबई | सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे चेओंग मिंग फुंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.
सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी चेओंग मिंग फुंग यांना दिली.
सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्सच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी पुढील आठवड्यात सिंगापूर विमानसेवा सुरू होत आहे. यासाठी मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे, असे चेओंग मिंग फुंग यांनी सांगितले. सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग व पोलिसांची कार्यपद्धती याबाबत बैठकीत चर्चा झाली.