महाविकास आघाडीत बिघाडी! आजी-माजी आमदारांमध्ये भर कार्यक्रमातच हमरीतुमरी…
जुन्नर | पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडी मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. जुन्नर तालुक्यातील एका भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर आल्याचे दिसले. यानिमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळाली.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावामधील एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी हा प्रसंग घडला. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेला समाविष्ट न केल्याबद्दल शरद सोनवणे हे नाराज होते. सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत आ.बेनके यांच्या आधीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांच्यात या रस्त्याच्या श्रेयवादावरून बाचाबाची झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील हा रस्ता असून या कामाचे श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला होता. काही काळानंतर दोन्ही नेत्यांनी सामंजस्याने घेत पुढील कार्यक्रम एकत्रितपणे पार पाडला.
“मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील आधीच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना महाविकास आघाडी सरकारने रद्दबातल करत नव्याने कामांचे प्रस्ताव मागवले होते. यामध्ये उंब्रज गावातील रस्त्याच्या कामांना या योजनेमध्ये आम्ही पुन्हा समाविष्ट केले. जर आम्हांला हे काम रद्द करायचे असते तर आम्ही यामध्ये दुसरी कामे समाविष्ट केली असती परंतु तसे न करता आधीची कामेही या यादीत पुन्हा समाविष्ट करण्यास आम्ही शासनाला सांगितले तसे पत्र ही आम्ही शासनाला दिले आहे”असे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी म्हंटले.
तर माजी आमदार शरद सोनवणे हे म्हणाले की ” सदर कामाची मागणी हि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात केली गेली व त्या कामांना आम्ही मंजुरीही मिळवली होती.”
यापुढील काळात तालुक्यातील महाविकास आघाडी मध्ये समन्वय साधला जाईल, असे आमदार अतुल बेनके यांनी यानंतर बोलताना सांगितले.