चित्रा वाघ यांची संधी हुकली, मुंबई विधानपरिषदसाठी भाजपकडून राजहंस सिंह यांचे नाव
राज्यातील 5 विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ही निवडणूक मुख्यतः भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. उमेदवारी साठी वाघ यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचं देखील बोललं जात होतं. मात्र, पक्षाने जाहीर केलेल्या यादीतून चित्रा वाघ यांचे नाव वगळण्यात आले आहे.
चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून विविध प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचं काम केले होते. माजी मंत्री संजय राठोड प्रकरण असेल महिलांवरील अत्याचार तसेच महिलांच्या संदर्भातील अनेक प्रश्न घेऊन त्या नेहमीच आक्रमकतेने काम करत होत्या.
महाविकास आघाडी सरकारला सातत्याने धारेवर धरत आल्या आहेत.
यामुळेच चित्रा वाघ यांना मुंबई मधून उमेदवारी दिली जाईल असं मानलं जात होतं. मात्र अचानक या जागेवर राजहंस सिंह यांचे नाव पुढे आले. त्यामुळं चित्रा वाघ यांचं नाव निश्चित मानलं जात असताना वाघ यांचा पत्ता कट कुणी केला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.