अनिल देशमुख यांना क्लीनचिट! चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
चांदीवाल आयोगाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला अहवाल सादर केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. चांदिवाल आयोगाने यापूर्वी आपला अहवाल गृह विभागाला सादर केला होता. त्यानंतर आज हा अहवाल मुख्यमंत्री ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली होती. भाजपसह इतर विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजकीय दबाव वाढल्यावर उद्धव सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली. चांदीवाल आयोगाच्या अहवालात काय आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
चांदीवाल आयोगाच्या अहवालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चांदीवाल आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, तो मी पाहिला नाही. मात्र हे आरोप खोटे असल्याचे आम्ही आधीच सांगत आहोत. अनिल देशमुख असो की नवाब मलिक, दोघांनाही खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आले आहे.