मुंबई | राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचे नामकरण सध्या वादाचं कारण बनलं आहे. या राणीच्या बागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं इंग्रजी नावे ठेवून करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे ठेवण्यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना “हत्तीच्या पिल्लाचं चंपा आणि माकडाचं नाव चिवा ठेवू” असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही टीका केली. मराठी नावं ठेवायला हवी अशी टीका भाजपने केली आहे, मग पुढील वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं नाव चिवा ठेऊ, असं पेडणेकर म्हणाल्या. केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या पातळीवर टीका करणं सोडा असा सल्ला महापौरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे. मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्यावा, विरोधकांची नक्की पोटदुखी काय आहे? टीका करून फक्त चमकायच असतं, अशी टीकाही त्यांनी केली. ऑस्कर पुरस्कार चालतो. मग ऑस्कर नाव का नाही? विरोधकांना आता कधीच उत्तर देणार नाही, असं त्या म्हणाल्या.