येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल – बाळासाहेब थोरात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षाची निवड झालेली नाही. याआधीचे दोन अधिवेशन हे अध्यक्षपदाविना झाले आहेत. मात्र, येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी सांगितलं.
बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुंबई मध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना थोरात यांनी विधानसभा अध्यक्षपदा बाबत भाष्य केलं. येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. नवीन ‘अध्यक्ष’ हा काँग्रेसचाच असेल, असं थोरात म्हणाले. अध्यक्षपदासाठी कुणाच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, याबाबत मात्र थोरात यांनी सांगण्यास नकार दिला. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्षपदाच्या नावासाठी निर्णय होईल, असं थोरात यांनी यावेळी सांगितलं.