मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा!
मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा
कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते
मुंबई : कर्करोग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. मात्र टाटा रुग्णालयातील प्रतीक्षा यादी पाहता रुग्णांना बराच काळ ताटकळावे लागते. खाजगी रुग्णालयांतील उपचार परवडणारे नसल्याने रुग्णांची अवस्था अधिकच बिकट होते. मात्र यापुढे कर्करोग झालेल्या रुग्णांना घराजवळ उपचार मिळणार आहेत. मुंबईतील चार डॉक्टरांनी एकत्र येऊन मुंबई ऑनको केअर केंद्राची स्थापना केली असून त्यामाध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या घरातच उपचार करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्र व मध्य प्रदेशात मिळून १६ केंद्रे सुरू करण्यात आली असून येत्या काही दिवसांत १८ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
डॉ. आशिष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रीतम काळस्कर आणि डॉ. क्षितिज जोशी या चार ऑनकोलॉजिस्ट डॉक्टरांनी एकत्र येत हे केंद्र सुरू केले. रुग्णांच्या घराजवळ ही सुविधा पुरवताना ती खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत स्वस्त असेल याची काळजीही डॉक्टरांच्या या तुकडीने घेतली. त्यामुळेच आजच्या घडीला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील १० शहरांमध्ये १६ ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला कर्करोग रुग्णांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आता या चार डॉक्टरांसह आणखीन १५ अन्कॉलॉजी डॉक्टरांनी एकत्र येऊन देशाच्या कानाकोपऱ्यात हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील १८ महिन्यांत १८ केंद्रे देशाच्या पश्चिमेकडील राज्यांत म्हणजेच गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई ऑनको केअर केंद्रातर्फे नुकताच टाटा कॅपिटलशी सहकार्य करार करण्यात आला. त्यातून जवळपास १० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका निधी जमा करण्यात आला आहे. हा निधी या केंद्राच्या वाढीसाठी तसेच रुग्णांना देण्यात येणारी आरोग्य सुविधा ही अधिकाधिक स्वस्त व माफक दरात पुरवण्यासाठी वापरण्यात येईल. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना किरकोळ दरात उपचार घेणे सोपे होणार आहे ,अशी माहिती मुंबई ऑनको केअर केंद्राचे संचालक डॉ. आशिष जोशी यांनी दिली.