अर्थसंकल्प २०२२ | नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत
मुंबई | कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. येत्या तीन वर्षांकरिता ४ लाख कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील गुंतवणूक वाढ होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डाॅलर्सपर्यंत वाढेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. कोरोना संकटातून सावरताना राज्य सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्याला प्राधान्य दिले.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; राज्य अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे या बँकेच्या शेतकऱ्यांना आज अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची २७५ कोटींची थकीत देणीही सरकारने अदा केली आहेत.
आजच्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी ३०२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. पीक नुकसान भरपाईसाठी इतर पर्यायांचा विचार केला जाईल,असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारणीसाठी १०० कोटीची तरतूद करण्यात आली. महिला शेतकऱ्यांना अनुदानासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. माजी सैनिकांसाठी कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जाईल. अन्न प्रक्रियेसाठी विशेष योजना राबविण्यात येणार. कोकण कृषी विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ यांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येकी ५० कोटी संशोधनासाठी देणार अशी घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजनेंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना ९११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत- @AjitPawarSpeaks #MahaBudget2022#महाबजेट2022#MahaBudgetSession pic.twitter.com/Xe6WgpnDyy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 11, 2022