गोव्यात उत्पल पर्रीकर उमेदवारीसाठी आक्रमक; भाजपच्या विद्यमान आमदारांनी प्रचार थांबवला
पणजी | गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाला अल्टीमेटम दिला आहे. उत्पल पर्रीकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षाच्या विद्यमान आमदारांनी प्रचार थांबवला आहे.
पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांचा प्रचार सोमवार (दि.१०) पासून सुरू होणार होता. परंतु, अचानक त्यांनी ही प्रचारदौरा रद्द केला आहे. मोन्सेरात हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप पणजीतील उमेदवार जाहीर करीत नाही तोपर्यंत प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
याबद्दल बोलताना बाबूश मोन्सेरात म्हणाले की, प्रचार करताना लोकांनी जर विचारले कुणाच्या तिकिटावर लढत आहे, तर मी काय उत्तर देणार आहे. हे माझ्यासाठी अपमानास्पद ठरेल. मला भाजपकडून तिकिट मिळेल की नाही, याबद्दल माहिती नाही. मी कुणाकडेही तिकिटाची मागणी केलेली नाही. परंतु, मला खात्री आहे की मी पणजीतून निवडणूक लढेन.
भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे यांनी 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आता या मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. मागील दोन महिन्यांपासून ते पणजीमध्ये प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात आता मागे वळून पाहणार नाही, असा पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विद्यमान आमदार मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक पणजी मधून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीमध्ये विजय मिळवला होता. या जागेवर त्यांनीही पुन्हा दावा केला आहे. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उत्पल यांनी स्वबळावर मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचीही भेट घेतली असल्याचे समजते.