भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज

कामगिरीत सुधारणा करण्याच्या हायकमांडकडून सूचना

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज

दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कामगिरीवर व कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या योजना राज्यातील जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचवल्या नाही. देगलूर बिलोली मतदारसंघात भाजपला मोठ्या फरकाने आलेलं अपयश तसेच महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटील अपयशी ठरले आहेत असाही ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आलाय.

राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना पाटील यांनी सर्वसमावेशकता दाखवली नाही व राज्य भाजपातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्व गोष्टींचा धागा पकडून काल झालेल्या तीन तासांच्या बैठकीत भाजपच्या दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी विरोधात आवाज उठवण्यात अपयश आल्याचेही हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येत्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही हायकमांड कडून देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.