प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे आखाती देशांमध्ये भारताचा निषेध केला जात आहे. कतार, कुवेतनंतर आता इराणनेही भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना बोलावून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आपल्या पक्षाच्या दोन नेत्यांवर त्यांच्या कथित अपमानास्पद वक्तव्याबद्दल कारवाई केली आहे. भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. त्याचवेळी दिल्ली भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
या टिप्पणीचा वाद अरब देशांमध्ये पोहोचल्यावर भारताच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली. कतारने भारतीय दूतावास अधिकारी दीपक मित्तल यांना याबाबत समन्स बजावले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय दूतावासाला निवेदन सादर केले आणि भारत सरकारने या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी केलीआहे. अशी विधाने हिंसाचाराला चिथावणी देऊ शकतात, असे निवेदनात म्हटले आहे. हे विधान संपूर्ण जगातील मुस्लिमांचा अपमान आहे, असे कतारने म्हटले आहे.
कथित अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी कुवेतनेही भारतीय राजदूताला समन्स बजावले. कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजदूताने कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवले आहे की हे वक्तव्य वैयक्तिक आहे. यासंबंधीत कोणत्याही प्रकारचे ट्विट किंवा विधाने हे भारत सरकारचे अधिकृत विचार दर्शवत नाहीत. अशी वक्तव्ये करणाऱ्या या लोकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय राजदूत म्हणाले की, भारत जगातील सर्व धर्मांचा आदर करतो.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा पुढील आठवड्यात होणार असल्याने इराणने चिंता व्यक्त केली आहे. याआधी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात टिप्पणीचे प्रकरण समोर आले आहे, त्यावर इराणने भारतीय राजदूताला बोलावले. या भेटीत भारतीय राजदूतांनी खेद व्यक्त केला. यासोबतच त्यांनी सांगितले की, पैगंबर मुहम्मद यांचा अपमान करणे हे निषेधार्ह आहे. याबाबत कोणतेही वैयक्तिक विधान ए भारत सरकारची अधिकृत भूमिका दर्शवत नाही. राजदूताने इराणला असेही सांगितले की ज्या लोकांनी हे वक्तव्य केले ते भारत सरकारशी संबंधित नाहीत आणि त्यांना पक्षाने काढून टाकले आहे.