चिंचवड पोटनिवडणूक: भाजप विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले?

पुणे : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच पिंपरी- चिंचवड शहरात राजकारण रंगयला सुरुवात झाली आहे. ‘राजा का बेटा राजा नही बनेगा. राजा वही बनेगा जो काबील होगा!’ अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे, ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी निवडणूक लढवली होती. तर, २०१९ ला शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी नशीब अजमावले होते. परंतु, या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी शड्डू ठोकला असून ते तयारी लागले आहेत.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली असून, आता विरोधकांनी देखील या पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो काबील होगा! अशी सूचक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगताप यांच्या कुटुंबीयातून लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात सरतेशेवटी पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेतील, असही त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.