नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश! “लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा होतील…” भाजपचा मलिकांना टोला
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद शांत झाला असताना आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. (Nawab Malik News Updates) या तक्रारीनंतर आता आयोगाने पुढील ७ दिवसांच्या आत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. वानखेडेंनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक छळ केला. त्यांच्या धर्माबाबात आणि जातीबाबत सातत्याने उल्लेख करत त्यांना त्रास दिला. त्यामुळे या तक्रारीनंतर आयोगाने नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मलिकांना टोला लगावला आहे. “लवकरच तुरुंगात बसून पत्रकार परिषदा होतील असे दिसते…”, असा टोला अतुल भातखळकर यांनी मलिकांना लगावला आहे.