बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ९८ कोटी रुपये मंजूर आ.अतुल बेनके यांची माहिती
जुन्नर तालुक्यातील १४ गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी मंजूर
जुन्नर तालुक्यातील बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा १ व टप्पा २ या पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ९७ कोटी ७८ लक्ष १५ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.
याबाबत आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा – १ व टप्पा – २ अशा प्रकारे या योजनेला मान्यता मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने भाग – १ साठी ३६ कोटी ३५ लक्ष ३४ हजार रुपये तर भाग – २ साठी ६१ कोटी ४२ लक्ष ८१ हजार रुपये मंजूर झाले आहेत. बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा लाभ उंब्रज, आळे, खामुंडी, गायमुखवाडी, पिंपरी पेंढार, नवलेवाडी, पिपळवंडी, वडगाव आनंद, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, बेल्हे, गुळुंचवाडी, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या भागातील गावांना होणार असून सदर योजना मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत वारंवार बैठका घेतल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. या योजनेसाठीच्या आमच्या पाठपुराव्याला अंतिमतः यश आले आहे. बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस ९७ कोटी ७८ लक्ष १५ हजार रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर योजनेच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.