बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचंच नाव नाही.
महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मुंबईतील विधानभवनात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं लावण्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतला होता. त्या निर्णयानुसार मुंबईतील विधानभवनात तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधिमंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले आहे, अशी माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंचं नाव नाही!
महाराष्ट्र विधानमंडळाकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा २३ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे. तर, निमंत्रक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नावं आहेत. या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख मात्र राजशिष्टाचारा प्रमाणं टाळण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना आमंत्रण!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारी रोजी विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विधानमंडळ सचिवालयाकडून ठाकरे कुटुंबीय म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना दुसरी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.