बारी होणारच! अफवांवर विश्वास ठेवू नका आढळराव पाटील यांचे बैलगाडा मालकांना आवाहन
मंचर | न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगी नंतर प्रथमच होणाऱ्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी याठिकाणी करण्यात आले आहे. कोरोना संदर्भात सध्या शासनाने नियम कठोर करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विषयावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “उद्या लांडेवाडी येथे होणाऱ्या बैलगाडा शर्यत होणार असून माझ्या काही विरोधकांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्याच्या खोट्या अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे. उद्याच्या बैलगाडा शर्यती स्थगित करण्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलेही आदेश आलेले नसून कृपया या अफवा व भूलथापांवर कोणीही विश्वास ठेवू नका. आपण सर्वजण कोरोनाचे नियम पाळून बैलगाडा शर्यती पार पाडू”
या बैलगाडा शर्यतींसाठी 700 हून अधिक टोकन वाटली गेली आहेत, हा आकडा रेकॉर्डब्रेक आकडा आहे अशी चर्चा बैलगाडा प्रेमींमध्ये सुरू आहे. न्यायालयाच्या सशर्त परवानगी नंतर उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथमच बैलगाडा शर्यती पार पडत आहेत. त्यामुळे बैलगाडाप्रेमी आणि बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.