बैलगाड्याला भिकार नाद म्हणून हिनवणाऱ्यांनीच लांडेवाडीची यात्रा भरू दिली नाही! अरुण गिरेंचा रोख नेमका कुणाकडे…!
बैलगाड्याला भिकारनाद म्हणून हिनवणाऱ्यांनीच लांडेवाडीची यात्रा भरून दिली नाही!
अरुण गिरेंचा रोख नेमका कुणाकडे…
मंचर | बैलगाड्याला भिकारनाद म्हणून हिनवणाऱ्यांनीच लांडेवाडीची यात्रा भरून दिली नाही! माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांची बैलगाडा मालकांमधील लोकप्रियता डोळ्यात खुपल्यानेच प्रशासनाच्या अडून हे असले उद्योग सुरू आहेत. नेमकी परवानगी कुणाच्या आदेशानंतर नाकारली हे ओळखण्याऐवढे बैलगाडा मालक आणि शेतकरी खुळे नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख आणि जि.प माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच परवानगी घेऊन भरवण्यात आलेली आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. शेतकऱ्यांनी जय्यत तयारी करून आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतींना काही तास अगोदर अचानक स्थगिती देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोविडच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठीच बैलगाडा शर्यतीची परवानगी स्थगित केल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.