या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच राहिली नाही – आण्णा हजारे; आण्णांचे उपोषण मागे
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. सोमवार दि.१४ फेब्रुवारीपासून आण्णा हे उपोषण करणार होते. तसं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कळवलं होतं. अण्णांनी या आंदोलनासाठी उपोषणाला बसावे की नाही. या बाबत ठराव मांडण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत वाईन विक्रीच्या निर्णया बाबत राज्य सरकारने पुनर्विचार करावा आणि अण्णांनी हे उपोषण करू नये. असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने आंदोलन न करण्याचा ठराव मंजूर झाल्यामुळे राज्यसरकारच्या वाईन विक्रीच्या विरोधात उद्या पासून करण्यात येणाऱ्या उपोषणातून माघार घेतल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.
अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात राळेगण सिद्धीत आज ग्रामसभा झाली. यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांच्या वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. “वाईन आमची संस्कृती नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तुम्ही वाईनची खुली विक्री करताय, ते पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही,” असं अण्णा म्हणाले. “महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी किर्तनकार किर्तन करतात. पण सरकार किराणा दुकानात वाईन ठेवण्याची परवानगी देत आहे. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही. आयुष्याची ८४ वर्ष झाली, तेवढी पुरेशी आहेत,” असं म्हणताना अण्णा हजारे यावेळी भावूक झाले.