‘मला ‘परम’सत्य सांगायचे आहे’!
देशमुख करणार परमवीर सिंग बाबत धक्कादायक खुलासे!
100 कोटी वसुली आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणी सुरू आहे. ‘मला परमबीर सिंग यांचे परम सत्य मला उघड करायचे आहे, त्यांचे सत्य आयोगाला सांगायचे आहे याकरता मला परवानगी द्यावी’ अशी खळबळजनक विनंती देशमुख यांनी चांदीवाल आयोगाकडे केली आहे.
अनिल देशमुख यांची गेल्या काही दिवसांपासूबन चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आज देशमुख यांनी चौकशी दरम्यान माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य केले आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांचे कोणते परम सत्य सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे सचिन वाझे यांचे वकील नायडू यांनी वारंवार पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव घेवून प्रश्न विचारल्याने आगामी सुनावणीस आयोग पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांना जबाबाकरता साक्षीकरता बोलावणार असल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे आता परमबीर सिंग यांचा मोठी भांडाफोड होईल का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.
चांदिवाल आयोगात गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलट तपासणी सुरू आहे यावेळेस सचिन वाझे यांचे वकील नायडू हे अनिल देशमुख यांची उलट तपासणी करत आहेत. त्यात देशमुखांनी अनेक खुलासे केले आहेत.सगळे प्रश्नोत्तर संपल्यावर अनिल देशमुख यांनी ‘मला परमबीर यांचे परमसत्य आयोगाला सांगायचे आहे’ परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यावर आयोगाने अनिल देशमुख यांना कायदेशीररित्या प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले असून यानंतर आयोग निर्णय देईल की त्यावर सुनावणी घ्यायची का? यामुळे आता अनिल देशमुख प्रतिज्ञापत्र सादर करतील, त्यात काय महत्वाचे खुलासे आहेत आणि काय परमसत्य आहे हे लवकरच स्पष्ट होईल.