माझ्यासमोर थर थर कापत होते परमबीर सिंग! अनिल देशमुखांची माहिती
मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवलेली मोटार सापडल्या प्रकरणी माहिती देत असताना परमबीरसिंह हे माझ्या समोर थरथर कापत होते, असे अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगासमोर सांगितलं आहे. परमबीरसिंह यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती नेमली आहे. या समितीसमोर देशमुखांना आज हजर करण्यात आले. समितीसमोर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे वकील योगेश नायडू यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना देशमुखांनी अनेक खुलासे केले. त्यापैकी अँटिलिया प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून ते एटीएसकडे हस्तांतरित करु नये, अशी परमबीरसिंह यांची इच्छा होती, असा खुलासा देशमुखांनी केला. देशमुख म्हणाले की, अँटिलिया प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्याची सूचना त्यावेळी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी केली त्याला परमबीरसिंहांनी विरोध करून मुंबई पोलिसांनीच तपास करावा, अशी भूमिका घेतली होती. मी हे प्रकरण 6 मार्च 2021 रोजी एटीएसकडे दिले होते. यानंतर गुन्हे गुप्तवार्ता विभागातून (CIU) मी सचिन वाझेची हकालपट्टी केली होती, असेही देशमुखांनी समितीसमोर आज सांगितले.
वाझे नियम पाळत नाही, असे तुम्हाला केव्हा वाटले, असे देशमुखांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, वाझे नियम पाळत नसल्याचे गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीला पहिल्यांदा लक्षात आले. त्यावेळी जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ मोटार सापडली होती. याचा तपास परमबीरसिंह यांनी 26 फेब्रुवारीला थेट वाझेकडे सोपवला. मात्र, त्यानंतर 1 मार्चला वाझेला तपासातून हटवून एसीपी नितीन अलकनुरे यांना तपास अधिकारी करण्यात आले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येचा मुद्दा 5 मार्चला उपस्थित केला होता. वाझेची बदली आणि निलंबनाची मागणी त्यांनी केली होती. मी 3 अतिरिक्त सचिवांच्या उपस्थितीत परमबीरसिंह यांना त्यावेळी फोन केला होता. अँटिलिया आणि मनसुख खून प्रकरणात तुम्ही सरकारला अंधारात कसे ठेवू शकता, अशी विचारणा मी केली होती. मी प्रश्न विचारताच ते थरथर कापू लागले होते. आम्ही अँटिलिया प्रकरणाची अधिक माहिती विचारली असता परमबीरसिंह हादरले होते. वाझे या सगळ्यात गुंतला असल्याचे माहिती नव्हते, असे परमबीरसिंह म्हणाले होते, असे देशमुखांनी समितीसमोर सांगितले.