खा.अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत, भूमिकेवरून नवा वाद! जितेंद्र आव्हाडांची उघड नाराजी

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे Why I Killed Gandhi या चित्रपटामधून नथुराम गोडसेची भूमिका घेऊन येत आहेत. त्यांच्या या भूमिकेवरून खा.अमोल कोल्हे यांना पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता आहे व यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत. कोल्हे यांच्या या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नराधमाने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या, त्याची भूमिका करणे मला मान्य नाही, असे आव्हाड यांनी म्हंटलं आहे. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये Why I Killed Gandhi हा चित्रपट स्विकारला होता. त्यावेळी कोल्हे हे कोणत्याही पक्षात सक्रीय नव्हते. तसेच, लोकप्रतिनिधीही नव्हते. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये सुरू झाले होते. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार झालेला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.

खा.कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांधी-नेहरुंची पुरोगामी विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुराम गोडसेची भूमिका करणे, हे मला पटलेले नाही. अभिनय हा वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने कोल्हे यांनी ती भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या, त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी विरोध केला आहे.

दरम्यान, Why I Killed Gandhi या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत खासदार कोल्हे म्हणाले की, या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात नव्हतो. कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे तो शंभर टक्के त्या विचारधारेशी सहमत असतोच, असे नाही. काही भूमिका आपण संबंधित विचारधारेशी सहमत नसतानाही आव्हान म्हणून करतो. एक कलाकार म्हणून भूमिका करणे आणि राजकारणाशी संबंध जोडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक व्यक्ती म्हणून मला वैचारिक भूमिका आहे. तो चित्रपट मी चार ते पाच वर्षांपूर्वी केलेला आहे, त्यामुळे त्यात काय आहे, ते मलाही ३० तारखेलाच कळणार आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकांनी या चित्रपटातील माझ्या भूमिकेला विरोध केला तरी मला वैषम्य वाटणार नाही. कारण, ती राजकीय भूमिका आहे. या भूमिकेबाबत अनौपचारिकपणे मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे की या चित्रपटाचे शूटींग कधी झाले आहे. आता तो प्रदर्शनाला आलेला आहे आणि तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.