पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी युवा नेते अमरिंदर सिंग राजा यांची निवड

पंजाब विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे गेल्यानंतर काँग्रेसने शनिवारी पंजाब सरकारचे माजी मंत्री अमरिंदर सिंग राजा यांची प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्षपदी आणि प्रताप सिंग बाजवा यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, भारतभूषण आशु यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच राजकुमार छब्बेवाल यांना विधिमंडळ पक्षाचे उपनेते बनवण्यात आले आहे.

चरणजीत सिंग चन्नी सरकारमध्ये परिवहन मंत्री असलेले अमरिंदर सिंग राजा बरार हे पक्षाचे एक आक्रमक युवा नेते मानले जातात. याआधी ते युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाजवा हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

काही आठवड्यांपूर्वी राज्यसभा सदस्य असलेले बाजवा पंजाबच्या कादियान विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पक्षाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.