‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे साकारणार भूमिका
सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ आगामी मालिका
‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत अमोल कोल्हे यांची कन्या आद्या कोल्हे साकारणार भूमिका
मुंबई | सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या आगामी मालिकेची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या मालिकेत कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची व रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मालिकेचे मुख्य आकर्षण ताराराणी यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्स घेतल्यानंतर ताराराणी यांच्या भूमिकेसाठी स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे ताराराणी यांच्या बालपणीची भूमिकेबद्दलही उत्सुकता होती. या भूमिकेसाठी या मालिकेचे निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे यांची मुलगी आद्या कोल्हे हिची निवड करण्यात आली आहे. बाल कलाकार आद्या कोल्हे हि भूमिका साकारणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अमोल कोल्हे व त्यांच्या मुलीचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत अमोल कोल्हे यांची मुलगी आद्या कोल्हे ही तारारणींची बालपणीची भूमिका पडद्यावर साकारणार आहे असे सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये सांगितले आहे.
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रमी इतिहास सर्वांसमोर मांडणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलीने या मालिकेतही एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये आद्याने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी तारा हिची भूमिका निभावली होती. तिच्या या भूमिकेचे कौतुक झाले होते. आता तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.