सत्यजीतदादांच्या रुपात अनुभवला देवदूत! बोरा कुटुंबियांकडून तांबे यांचे आभार
श्रीगोंदे | सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसासमोर कधी कोणतं संकट उभं राहिलं हे सांगता येत नाही. कधी कधी संकट हे इतके मोठे असते की त्या संकटाला कसे तोंड द्यावे हे सुचत नाही. पण अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती मदतीचा असा हात देते की, जणू देवदूतच मदतीला धावून आला असे वाटते.
अशीच प्रचिती अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे समीर बोरा यांना एका प्रसंगाच्या रूपाने आली. बोरा यांचे मेहुणे योगेश मुथा (रा. अहमदनगर) यांना अमरावती येथे मोठा अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. घाबरलेल्या नातेवाईकांना या परिस्थितीत काय करावे काही सुचत नव्हते. अशावेळी समीर बोरा यांना आठवण आली ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची! त्यांनी ताबडतोब तांबेंना फोन लावला व घडलेली सर्व घटना सांगितली. तांबे यांनी सर्वप्रथम त्यांना ‘घाबरू नका’ असे म्हणत धीर दिला व मुथा यांचे सर्व वैद्यकीय रिपोर्टस् पाठवण्यास सांगितले. ते त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवून योग्य सल्ला देण्यास सांगितले.
त्यानुसार डॉ. शैलेंद्र यांनी अवघड शस्त्रक्रिया करावी लागेल व ती फक्त मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्येच होऊ शकते असे सांगितले. पुन्हा प्रश्न उभा राहिला तो रुग्णास अमरावती ते मुंबई हे सुमारे ७०० किलोमीटरचे अंतर कसे घेऊन जायचे, कारण रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. हा सुमारे १४ तासांचा प्रवास करणे शक्य नव्हते. इथेही पुन्हा सत्यजीत तांबेच मदतीला धावून आले. त्यांनी आपला संपर्क वापरून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. मुथा यांना मुंबई येथे नेण्यात आले व शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. शैलेश, डॉ. तुषार थोरात, डॉ. प्रभा यादव यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया केली. आज योगेश मुथा हे सुखरूप आहेत.
सत्यजीत दादा देवदूतासारखे धावून आले म्हणूनच आज माझे मेहुणे वाचू शकले अशा शब्दांत समीर बोरा हे कृतज्ञता व्यक्त करतात. एका राजकारण्याचा हा वेगळाच पैलू यानिमित्ताने समोर आला.