छाजेड कुटुंबियांच्या दातृत्वाला सत्यजीत तांबेंची साथ!
जिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिलं पत्र
शेवगाव | काही लोकांनी समाजासाठी दाखविलेले दातृत्व असे असते की, ते बघून माणसं अवाक झाल्याशिवाय राहत नाही. आज एकेक इंच जागेसाठी माणसं एकमेकांच्या जीवावर उठलेली आपण बघत असतो. पण शेवगाव तालुक्यातील लाडजळगावच्या एका शेतकऱ्याने सामाजिक कार्यासाठी तब्बल ४ एकर जमीन दान केली आहे.
लाडजळगावचे कै. ताराचंद छाजेड यांनी ४० वर्षांपूर्वी ते हयात असताना गोरगरीबांना राहण्यासाठी जागा मिळावी या उदात्त हेतूने आपल्या सुमारे ४ एकर जमीनीचे बक्षीसपत्र करुन दिले. या ठिकाणी आज सुमारे ५० ते ६० घरे व २५० ते ३०० लोकांची त्या ठिकाणी वस्ती वसलेली आहे. छाजेड यांचा हा दानशूरपणा नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे शासकीय दिरंगाईमुळे आज तब्बल ४० वर्षांनंतरही ही जागा सदर रहिवाशांच्या नावे हस्तांतरित झालेली नाही. ही बाब ताराचंद छाजेड यांचे पुत्र प्रमोद छाजेड यांना समजल्यावर सध्या ते यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत.
छाजेड कुटुंबियांच्या या सामाजिक कामाची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना समजताच यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नुसते आश्वासन देऊनच ते थांबले नाही तर त्यांनी ताबडतोब अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. छाजेड कुटुंबियांच्या या कामाचे व धडपडीचे तांबे यांनी कौतुक केले असून समाजाला आदर्शवत असे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.