शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचाही पराभव तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
सातारा जिल्हा बँक निवडणूक
सातारा जिल्हा बँक निवडणूक : शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचाही पराभव, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतमोजणीला धक्कादायक निकालांनी सुरुवात झाली. या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या संदर्भात निकाल लागण्याआधीच काही वक्तव्ये केली जात होती ती खरी ठरली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. आ.शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीचा पहिलाच निकाल हा धक्कादायक लागला आहे. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.
जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून 25 मते मिळवून शशिकांत शिंदे यांचा पराभव करत ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. तर पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर 58 मते घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी 14 मतांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे.
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे 74 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकूण 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली.