मुंबई विधान परिषदसाठी शिवसेनेने दिली सुनील शिंदे यांना उमेदवारी
रामदास कदमांना डावलले?
राज्यातील पाच जागांसाठी घेण्यात येत असलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे, तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या जागेवर जेष्ठ नेते रामदास कदम यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र गेल्या काही दिवसांत शिवसेना नेतृत्व कदमांवर नाराज आहेत अशाही बातम्या येत होत्या. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण कदमांना भोवलं? अशी शिवसेना अंतर्गत चर्चा आहे.
या संदर्भात खा.संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले, रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कडवट शिवसैनिक आहेत. अनेक वर्षे त्यांनी आमदारकीआणि युती सरकार मध्ये मंत्रीपदही सांभाळले आहे. तसेच सुनिल शिंदे हे देखील कडवट शिवसैनिक आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडून त्यांनी त्याग केला आहे. वरळीचे सुनिल शिंदे हे आमदार होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती जागा त्यांनी सोडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या त्यागाचे निष्ठेचे स्मरण ठेवले आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी उमेदवारी दिली आहे.