अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा घणाघात

अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित कट

अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना म्हटले.

काही दिवसांपूर्वी मालेगाव, अमरावती, नांदेड येथे त्रिपुरातील कथित हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम समुदायाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले. या बंद दरम्यान भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला होता.

अमरावतीमध्ये झालेला हा हिंसाचार सुनियोजित कट आहे व हा कट अनिल बोंडे यांनी आखला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंसाचार घडवून आणण्यासाठी काही तरुणांना पैसे वाटण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही मलिक यांनी यावेळी केला. अमरावती येथील हिंसाचार हा दोन गटात झाला नाही. त्याशिवाय या हिंसाचाराचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही, त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे मलिक यांनी म्हटले. मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नगरसेवक हा एमआयएमचा असून राष्ट्रवादीचा नसल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.