युतीमध्ये 25 वर्षे नको ती अंडी उबवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
बॉम्ब फोडा पण धुर काढू नका मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
बारामती | राजकारणात आम्ही देखील शरद पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरद पवार जे करतायेत ते बघायला हवे. राजकारणात देखील इनक्युबेशन सेंटर आम्ही पंचवीस- तीस वर्षांपूर्वी उघडले होते. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही नको ती अंडी उबवली, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला लगावला. ते बारामतीमधील कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते.
गेले दोन दिवस माझे पाय धरलेत. पाय कधी डगमगत नाहीत आणि डगमगणारही नाही. पण गेले दोन दिवस झाले पाय धरलेत त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला त्यामुळेच या कार्यक्रमास येण्यास उशीर झाला, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धुर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही, असे’ म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.