वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, वसूली गँगचा पर्दाफाश होतोय – नवाब मलिक
बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? - मलिक
मुंबई | समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.
मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. समीर वानखेडे मुंबईत आल्यानंतर प्राव्हेट आर्मी उभी केली. या आर्मीनं कोट्यवधींची वसूली केली आहे. समीर वानखेडे यांनी मालदीवमध्ये कोट्य़वधी रुपायांची वसूली केली आहे. समीर वानखेडे एक लाख रुपयांची पँट घालतात. सत्तर हजार रुपयांचा शर्ट घालतात. दोन लाख रुपयांचे बूट घालतात. त्यांच्या मनगटावर लाखो रुपयांचं घड्याळ आहे. एखाद्या इमानदार आधिकाऱ्यांकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
कालच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. त्यात ते माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला. मला त्यांना सांगायचे आहे की, देवेंद्रजी तुम्ही तुमचे खास मित्र समीर वानखेडेकडून पंचनामा मागवून घ्यावा. त्यात कुठेही गांजा किंवा आपत्तीजनक वस्तू प्राप्त झाली याचा उल्लेख नाही. ज्यादिवशी जावयाच्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी मीडियाला खोट्या बातम्या देऊन आम्हाला बदनाम केले गेले. माध्यमांना आज मी तो पंचनामा देत आहे. आता देवेंद्रजींनी माफी मागणार का? तसेच बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीनंतर कशाला वाट पाहाता? माझं अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कुणीचं सिद्ध करु शकत नाही, असं आव्हान नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर तुम्ही राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तेव्हा काय केलं? कारवाई का केली नाही? असाही सवाल मलिकांनी उपस्थित केला.
नवाब मलिक यांनी यावेळी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी आधिकारी व्ही. व्ही सिंग यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जावयाला अटक केल्यानंतर व्ही. व्ही सिंह यांनी लँड क्रूझर या गाडीची मागणी केल्याचा आरोप केलाय. व्ही. व्ही. सिंग आणि त्यांचा चालक माने समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीसोबत लोकांना फसवत आहेत. जेएनपीटी बंदरावर 15 दिवसांपासून 51 टन ड्रग्ज पडून आहेत. पण कारवाई का केली जात नाही? असेही मलिक म्हणाले.