फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचे खेळ – नवाब मलिक
जयदीप राणा, निरज गुंडे या व्यक्तींबद्दल मलिक यांचे खुलासे
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून क्रूझ ड्रग प्रकरणासंदर्भात राज्यातील राजकारणात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच मलिक यांनी आज पुन्हा एकदा आरोप करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिकांच्या निशाण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस असल्याचे दिसत आहे. नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि अनेक गंभीर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन ड्रग्जचा खेळ राज्यात सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.
फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी मलिक यांनी केली आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली केली असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.
निरज गुंडे हा फडणवीस यांच्यासाठी काम करतो, गुंडेच्या माध्यमातूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे असा हल्लाबोल मलिक यांनी फडणवीसांवर केला आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केला आहे असे सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचे म्हटले आहे.