एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणाचा वापर नागरिकांना बदनाम करण्यासाठी होतोय – जयंत पाटील

रत्नागिरी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. नवाब मलिक हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत. केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी केला जात आहे तसेच राजकीय दृष्ट्याही केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दापोली येथील पत्रकार परिषदेत केला.

“केंद्र सरकारच्या तत्कालीन सेवेत जाताना फसवणूक करून जर कोणी सेवेत गेले असेल तर तेही गंभीर आहे. शाहरुख खानच्या मुलाला क्रुझवर जाण्याआधीच ताब्यात घेतले असेल तर ती देखील गंभीर गोष्ट आहे. आज जे शाहरुख खानच्या मुलाच्या बाबत घडलंय ते इतरांच्या बाबतीतही झाले असावे. या सर्व गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी”, अशी मागणी मा. जयंत पाटील यांनी केली.

मा. नवाब मलिक यांनी ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत त्या एकट्या वानखेडे यांच्या विरोधातील नाही तर एकंदर यंत्रणा कसे चुकीचे काम करुन लोकांची दिशाभूल करत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

आत एनसीबीची दिल्लीमधील टीम समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी आली आहे. वानखेडे यांनी आयआरएसच्या नोकरीसाठी प्रवेश घेताना कोणत्या जातीच्या आधारावर प्रवेश घेतला याचे कोडे लवकरच सुटेल. फसवणूक कुणी केली आणि कशी केली? याचा खुलासा देखील लवकरच होईल. वानखेडे यांच्या चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम सत्य बाबींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, अशी खोचक टीकाही पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.