‘महाराष्ट्र केसरी’ हर्षवर्धन सदगीर अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; सत्यजीत तांबे यांनी सरकारला सुनावले खडे बोल!

दोनदा ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावून राज्याचा गौरव वाढवणाऱ्या हर्षवर्धन सदगीर यांना अजूनही सरकारी नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुणवंत खेळाडूंचा असा अपमान करणे योग्य नाही, शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या अफाट कष्टांच्या आणि जिद्दीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी केली आहे. सलग दोनदा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. या यशानंतर राज्य शासनाकडून त्यांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले की, खेळाडू जेव्हा मैदानात घाम गाळतो, तेव्हा तो संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल करत असतो. हर्षवर्धन सारख्या मातीच्या खेळाडूने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. मात्र, विजयाचा गुलाल उधळल्यानंतर प्रशासकीय पातळीवर त्यांना लालफितीच्या कारभारात अडकवून ठेवणे चुकीचे आहे. शासनाने दिलेला शब्द पाळणे हे केवळ हर्षवर्धन यांच्यासाठीच नाही, तर उद्याच्या पिढीतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही आवश्यक आहे.

कुस्ती हा महाराष्ट्राचा मातीतील खेळ आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण हर्षवर्धन यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. अशा परिस्थितीत एका चॅम्पियन खेळाडूला आपल्या हक्काच्या नोकरीसाठी सरकारकडे मागणी करावी लागणे, हे क्रीडा क्षेत्रासाठी पोषक नाही. त्यामुळे आता शासन यावर काय भूमिका घेते आणि हर्षवर्धन सदगीर यांना कधीपर्यंत नियुक्ती पत्र मिळते, याकडे संपूर्ण क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.