मंत्री भुजबळ यांच्या हस्ते चाळीसगाव येथील फुले स्मृतीस्मारकाचे लोकार्पण

आजही मागासवर्ग समाज मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यांच्यासाठी ही जातनिहाय जनगणना अतिशय महत्वाची, ओबीसींच्या आरक्षणाची लढाई अद्यापही संपलेली नाही- छगन भुजबळ

चाळीसगाव,दि.२५ ऑगस्ट :- आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून चाळीसगाव मध्ये फुले दांपत्याचे हे उभारलेले हे स्मारक केवळ वास्तू नाही, तर ते एका क्रांतीचे प्रतीक आहे. हे स्मारक भविष्यातील प्रत्येक पिढीला सामाजिक क्रांतीचे, समतेचे स्मरण करून देईल.आजही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची अतिशय गरज आहे. ते केवळ इतिहासातील व्यक्तिरेखा नाहीत, तर ते आजच्या समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे स्मारक म्हणजे त्यांच्या विचारांचा जिवंत संदेश आहे. “शिक्षण, समता आणि बंधुता” हेच आपल्या स्मारकाचे, आपल्या समाजाचे आणि आपल्या जीवनाचे ब्रीद असावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ व मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, चाळीसगावमध्ये अतिशय महत्वाच्या ठिकाणी फुले दांपत्याचे स्मारक उभे करण्यात आले आहे. या स्मारकाची निगा सर्वांनी राखावी. या देशात स्वराज्याची क्रांती छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली तर सामाजिक क्रांती महात्मा फुले यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या प्रमाणे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम केले. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले. स्वतःच्या संपत्तीतून त्यांनी समाजासाठी कामे केली. शेतकरी वर्गाला अनेक महत्वाच्या सुधारणा त्यांनी करून दिल्या. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ सर्वांनी वाचायला हवं असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन” हा विचार त्यांनी मांडला आणि त्यावर स्वतःच्या जीवनाची शिक्कामोर्तब केले. त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. आज आपण सर्वजण सहज शाळेत जातो, शिक्षणाचा हक्क मिळवतो. पण त्या काळी मुलींच्या शिक्षणाला पाप मानले जायचे. अशा काळात जोतिबांनी सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून समाजातील स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून दिली. महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीत तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आदी सहकारी सहभागी होते. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. लहूजी वस्ताद साळवे आणि रानाबा महार हे त्यांच्या पाठीशी हिमतीने उभे राहिले. सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या गलिच्छ प्रथांना,अज्ञानाला,पुरुषसत्ताक मानसिकतेला थेट कडाडून विरोध दर्शविला. मुलींना शिकवताना त्यांना समाजाने अपमानित केले, शेण, गोवऱ्या फेकल्या, दगड मारले, पण त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचे योगदान हे भारतीय शिक्षण क्षेत्रातील पहिलं पान असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ओबीसीचे जे आरक्षण धोक्यात आले होते. त्याविरुद्ध आपण लढा दिला. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मदत केली. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ३० वर्षांहून अधिक वर्षांची मागणी होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आजही मागासवर्ग समाज समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यांच्यासाठी ही जातनिहाय जनगणना अतिशय महत्वाची आहे. ओबीसींच्या आरक्षणाची लढाई अद्यापही संपलेली नाही. हे आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे ही आपली मागणी आहेच परंतु आपल्या न्याय हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व समाजबांधवांनी असून या लढाईत सर्व समाज बांधवांनी सहभागी झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणासाठी २०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. श्री.क्षेत्र अरणच्या विकासासाठी १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या सबलीकरणासाठी महाज्योती साठी भरीव तरतुद करण्यात आली आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्म दिवस महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये “महिला शिक्षण दिन’’ म्हणून साजरा केला जात आहे.नायगांव हे स्थळ ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगांव जि. सातारा राष्ट्रीय स्मारक. पर्यटन निवास केंद्र, २०० मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) सुरु करण्यासाठी १८० कोटींची तरतुद करण्यात आली आहे. १० एकर जागेमध्ये मुलींसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून रखडलेल्या या स्मारकाचे काम दोन दिवसांत मार्ग लावण्यात आला. आज चाळीसगावच्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे अतिशय चांगलं शिल्प उभे राहिले आहे. चाळीसगाव ही सत्यशोधक समाजाची भूमी असून याठिकाणी फुले दांपत्याचे स्मारक याभूमीत होणे अतिशय महत्वाचे आहे. याठिकाणी आपण स्मारक उभे केले आहे. त्यांचे विचार आपण समाजात रुजवले पाहिजे. या स्मारकाची निगा राखण्याची जबाबदारी सर्व समाज बांधवांची असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार योगेश टिळेकर,आमदार मंगेश चव्हाण, सचिन महाजन, डॉ.सुनिल माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, डॉ.कैलास कमोद, डॉ.डी.एन.महाजन, डॉ.संजय माळी, डी.एन.महाजन, सतिश महाजन, वसंत पाटील,दिनेश महाजन, उद्धव माळी, जगन्नाथ महाजन, उमेश महाजन, यज्ञेश बाविस्कर, वासुदेव माळी, सचिन महाजन,देवयानी ठाकरे, सुनील माळी, पवन देवरे, रमेश सोनवणे, अभिलाषा रोकडे, काकासाहेब माळी, आबा महाजन, भीमराव खलाने, पोपटराव भोळे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.