बदलत्या काळानुसार शेतीसाठी एआय तंत्रज्ञान स्वीकारा- मंत्री भुजबळांचे शेतकऱ्यांना आवाहन
कृषी उद्योजक पुरस्काराचे छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरण; ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी उद्योजक प्रदर्शनाचे उद्घाटन
नारायणगाव,,दि.१८ ऑगस्ट:- बदलते हवामान, नैसर्गिक संकटे यासह विविध कारणांनी शेती क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहे. या आव्हानांना तोंड देऊन यशस्वी शेती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड देणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने आयोजत भव्य शेतकरी मेळावा आणि कृषी उद्योजक पुरस्कार सोहळा कृषी विज्ञान केंद्र,नारायणगांव येथे पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शेती क्षेत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे अमूल्य योगदान दिले. त्यामुळे आज अन्न, धान्याच्या उत्पादन भारत हा अतिशय मोठा उत्पादक देश बनला आहे. केवळ देशात नाही तर परदेशातही मोठ्याप्रमाणात अन्न, धान्यांची निर्यात आपण करतो आहोत. तसेच देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्याचा विचार करून सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात गोदाम उभारले जात आहे. ज्या माध्यमातून भविष्यातील अन्न धान्यांची गरज आपण पुरवू शकणार आहोत. आजही राज्यात ५४ हजार रेशन दुकानांच्या माध्यमातून आपण अत्यंत अल्पदरात नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देत आहोत असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. तसेच जय जवान जय किसान आणि जय विज्ञान असाही महत्वपूर्ण नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती क्षेत्राला विज्ञानाची जोड द्यावी. एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करावा. या माध्यमातून शेतीमध्ये दर्जेदार उत्पादन तसेच नुकसानही टाळता येणे शक्य होणार आहे. तसेच शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची कास शेतकऱ्यांनी धरावी. त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा कमावता येऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती. प्राचीन काळापासून ‘अन्नदाता’ हा आपल्या संस्कृतीतील सर्वोच्च सन्मान आहे. जगातील कोणत्याही प्रगत देशाचा इतिहास बघितला तरी शेती आणि शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय त्या देशाची भरभराट झालेली नाही. त्यादृष्टीने महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्व.गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ग्रामोन्नती मंडळाची स्थापना केली. ग्रामोन्नती मंडळ हे ग्रामीण भागातील शिक्षण आणि विकासासाठी समर्पित एक अग्रणी संस्था असून संस्थेमार्फत विविध तांत्रिक, कृषी, आद्योगिक व तत्सम शैक्षणिक कार्यक्रम आणि अभ्यासक्रम प्रदान करून विद्यार्थ्यांना सशक्त बनवत आहे. ग्रामोन्नती मंडळाचे दर्जेदार शिक्षण आणि समर्पित कर्मचारी ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देत असून या संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्रांनी ग्रामीण भागात “शेतीला विज्ञानाची जोड” दिली आहे. नारायणगावसारख्या केंद्रांनी हजारो शेतकऱ्यांना नव्या संधी दिल्या आहेत. आजचा काळ हा प्रचंड बदलाचा आहे. हवामानातील अनिश्चितता, पावसाचं अनियमित प्रमाण, जमिनीतील सुपीकतेचा घट, बाजारातील कडवी स्पर्धा,उत्पादन खर्च वाढ या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला नवीन पद्धतींचा अवलंब करावा लागेल.शेतकरी बांधवांनी शेती क्षेत्राला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. फक्त एका पिकावर अवलंबून न राहता फळ, भाजीपाला, बागायती व पशुपालन यांचा संगम करावा. कच्च्या मालापासून प्रक्रिया उद्योग निर्माण करून थेट ग्राहकांशी संबंध असेलेले मॉडेल विकसित करून स्थानिक बाजारपेठ निर्माण करावी. मातीशी नातं ठेवा, विज्ञानाशी मैत्री करा आणि बाजारपेठेवर पकड मिळवा असे आवाहन यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
उद्योजक शेतकऱ्यांचा झाला सन्मान:
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रगतिशील उद्योजक शेतकरी कृष्णा थोरात, सुरेखा काटे, विलास काळे, राजेंद्र कानडे, अमर पडवळ, सौ.रविना सरचिडे, सौरभ भोळे यांचा प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अतुल बेनके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी अधिकारी गणेश भोसले, माजी सनदी अधिकारी सुखदेव बनकर, प्रकाश पाटील, माऊली खंडागळे, शशिकांत वाजके, डॉ.अनंत कुलकर्णी, डॉ. भीमराज भुजबळ, संदीप डोळे, विकास दरेकर, मोनिका मेहेर यांच्यासह शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.