सत्यजीत तांबे यांचा पुढाकारातून नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गासाठी सर्वपक्षीय शक्ती एकवटली !
०४ मार्च, पुणे : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गाने व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची बैठक पहिली बैठक आज मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विकासाच्या दृष्टीने पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्ग हा अधिक लाभदायक ठरेल, असा निर्धार करण्यात आला.
या बैठकीला मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ प्रत्यक्ष उपस्थित होते. तर खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, आ. बाबाजी काळे, आ. शरद सोनवणे यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन हा विषय चर्चेस आणावा असा निर्णय झाला. तसेच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही याविषयी चर्चा करण्याचे नियोजन बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नाशिक आणि पुणे यांना जलद गतीने जोडण्यासाठी प्रस्तावित असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
आ. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा अनेकदा लावून धरला आहे, त्यासोबत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सातत्याने भेट घेऊन हा मुद्दा शासन दरबारी लावून धरला आहे. नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे गेल्यास या प्रकल्पचा मूळ उद्देश साध्य होणार नाही आणि यासाठी कृती समितीच्या माध्यमातून एल्गार करण्याचा पुढाकार सत्यजीत तांबे यांनी घेतला होता, त्यानुसार ही पहिली बैठक मुंबईत पार पडली. येत्या काळात कृती समितीच्या माध्यमातून हा लढा कुठपर्यंत जाईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.