मुंडेंनी दिला, कोकाटेंचा राजीनामा कधी?
०४ मार्च, मुंबई : महाराष्ट्रातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये काही ठोस पुरावे आणि व्हिडिओ सादर करण्यात आले. हे पुरावे सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना, “या प्रकरणाशी माझा कोणताही थेट संबंध नाही, परंतु राजकीय आणि सामाजिक वाद टाळण्यासाठी मी माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा देत आहे,” असे स्पष्ट केले. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात या प्रकरणाचे परिणाम कोणत्या दिशेने जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील आणखी एका वरिष्ठ मंत्र्यांवरही राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. कागदपत्रे फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पदावर कायम राहिल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून हिणवल्याने कोकाटे यांच्या विरोधात आधीच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर कोकाटे यांच्या भवितव्याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राज्य सरकारने या संपूर्ण घडामोडींवर अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र, राज्याच्या राजकीय व सामाजिक स्थैर्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.