CM Devendra Fadnavis यांच्याकडे Satyajeet Tambe यांची बाल सुधारगृहांच्या सुधारणेची मागणी, Aditi Tatkare यांनी घेतली Action!
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आदिती तटकरे यांचा बाल सुधारगृह सुधारणांसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय
प्रतिनिधी,
बाल सुधारगृहांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मागील अधिवेशनात आ. सत्यजीत तांबे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. बाल सुधारगृहांचा विषय हा महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील येत असल्याने आ. सत्यजीत तांबे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत बाल सुधारगृह कसे असावे, जगातील विविध देशांतील बाल सुधारगृहांचे महत्त्व आणि त्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते, यावर सखोल चर्चा करण्यात आली. नाशिकमधील आर्किटेक्ट्स अदेश ढोली आणि तन्मय पाटील यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. या सादरीकरणाच्या आधारावर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये सुधारणा कशी करता येईल, याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
बाल सुधारगृहात अशा मुलांची रवानगी केली जाते जे अल्पवयीन आहे, पण त्यांनी गुन्हा केला आहे. बाल सुधारगृह सामान्यपणे सरकार किंवा सरकारी संस्थांकडून चालवले जातात. यात शिक्षण, सल्ले आणि नोकरीसाठी प्रशिक्षण या सारख्या महत्त्वाच्या सुविधा दिल्या जातात. बालसुधार गृहांचे वैशिष्ट्ये हे या अल्पवयीन मुलांना पुढील भविष्यात जबाबदार नागरिक बनवण्याचे असते. अल्पवयीन मुलांना कठोर शिक्षा करता येत नसल्यामुळं या मुलांची रवानगी न्यायालयाकडून बाल सुधार गृहात करण्यात येते. त्यामुळे बाल सुधारगृहे चांगली असणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातून किरकोळ आणि गंभीर गुन्हे झालेल्या मुलांना विधी संघर्षित बालक म्हणून संबोधले जातात. यात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात समावेश असलेल्या मुलांना बालसुधार गृहात रवानगी केली जाते. त्यानंतर काही काळ राहिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना मुक्त केले जाते. याकाळात त्यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी शालेय व व्यावसायिक कोर्स यासह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.