मालेगाव,दि.२४ जानेवारी :- मालेगाव तालुक्यातील अजंग येथील व्यंकटेश्वरा को ऑप पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री, विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री यांची उपस्थिती होती. तरीही लक्ष वेधलं ते भुजबळांच्या उपस्थितीने. या कार्यक्रमादरम्यान शाह आणि भुजबळ मंचावर शेजारीच बसले होते आणि त्यांच्यात काहीतरी हितगुज झाल्याचेही दिसले. यावेळी शाह यांनी आपल्या भाषणात भुजबळांचा ‘एनडीएचे महत्त्वाचे नेते’ असा विशेष उल्लेखही केला. त्यामुळे चर्चांना उधाण आले.
याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील उपस्थित लोकांशी संवाद साधला. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसानचा नारा दिला होता. व्यंकटेश्वरा कंपनीच्या जवानांनी अतिशय कमी कालावधीत शेती प्रक्रिया उद्योगात यश मिळवत जय जवान जय किसानचा नारा खरा करून दाखविला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान ज्याप्रमाणे काम करतात त्याच प्रमाणे शेतकरी देखील अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. यावरच व्यंकटेश्वरा कंपनीने आपली वाटचाल करत असून केवळ तीनच वर्षात कंपनीने शेती क्षेत्रात केलेलं काम हे बघता विश्वासच बसत नाही. अगदी उजाड माळरानावर शेतीचा केलाला विकास बघता कंपनीने मिळविलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पाचशे एकराच्या परिसरात कंपनीने शेती, दूध प्रक्रिया उद्योग, गोशाळा, खत प्रकल्प, अगरबत्ती निर्मिती, नैसर्गिक रंगांची निर्मिती असे विविध यशस्वी प्रयोग केलेले आहे. शेती क्षेत्रात विज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग करून व्यंकटेश्वरा कंपनीने मोठ यश मिळविले आहे. नापीक जमिनीला सुपीक करून स्वर्ग बनविण्याचे काम डॉ.शिवाजीराव डोळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम काम करत आहे. संपूर्ण टीमने सामूहिक रित्या मिळविलेले यश अनेकांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री जयकुमार रावल, मंत्री माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, माजी खासदार विकास महात्मे, आमदार नितीन बोरसे, स्वामी संविदानंद सरस्वती, व्यंकटेश्वरा कंपनीचे प्रमुख डॉ.शिवाजीराव डोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.