पुणे/आंबेगाव- (दि. २३) दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” माजी केंद्रीय कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., येथे ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना सन २०२३-२४ गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कर, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कर, शेतकरी ऊस भूषण पुरस्कार, सहकारी साखर कारखान्यांचे अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी स्विकारला.
कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांचे कुशल नेतृत्व, दूरदर्शी नेतृत्व व उत्कृष्ट मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच हा पुरस्कार कारखान्याला मिळू शकला, अशा भावना उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केल्या. दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासह तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था प्रगतीपथावर असून त्यामुळे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील शेतकरी, सभासद, कर्मचारी, कामगार सर्वच जण त्यांच्या नेतृत्वाबद्दल समाधानी आहेत. याबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातूनही ते आपल्या नेतृत्वकची व कर्तृत्वाची चुणूक दाखवत असून त्याचा फायदा राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले कार्यक्षेत्रात व परिसरात ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, व्हि.एस.आय. निर्मित निविष्ठाचा वापर, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, रासायनिक खतांचा पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापन, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे संचालक मंडळ व महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.