महाविकास आघाडीच्या पराभवाची ‘ही’ आहेत १२ कारणे ! महायुतीचा ऐतिहासिक विजय!

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भाजपा 133 जागा, शिवसेना 75 जागा तर राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीनुसार महायुती ही 249 जागांवर आघाडी राहिली आहे. तर शिवसेना (युबीटी) 20 जागांवर, काँग्रेस 15 तर राष्ट्रवादी (एसपी) 10 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात स्थापन होणार असल्याचं चित्र आहे. कोणत्या कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला? महायुती कशामुळे वरचढ ठरली, हे जाणून घ्या.

१)लाडकी बहीण योजना-
महायुती सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात राबविलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ प्रचंड लोकप्रिय ठरली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या कोट्यवधी महिलांना किमान साडेसात हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ‘भाऊबीज’ म्हणून महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. एक महिना अगोदरच पैसे जमा करण्यात आल्यानं महायुती सरकारला महिला मतदारांचा विश्वास जिंकता आला. याचप्रमाणं राज्य सरकारनं विविध योजनांतून लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले.

२)मनोज जरांगे फॅक्टर निष्प्रभ
– मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होते. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणं उमेदवार दिले नाहीत. मात्र, नाव न घेता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचं आवाहनं केले. असे असले तरी त्याचा महायुतीच्या उमेदवारांवर विशेषत: मराठवाड्यातील 46 विधानसभा जागांवर परिणाम झाला नाही. महायुतीची मराठा समुदायाच्या मतांचे विभाजन टळल्याचं निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं.

३)लोकसभेतील चुकांची टाळली पुनरावृत्ती-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’ म्हटल्यानं त्यांच्याबाबत सहानुभुतीची लाट निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या सभांमध्ये शरद पवारांचा नामोल्लेख टाळला. लोकसभा निवडणुकीत जर भाजपाला बहुमत मिळाले तर घटनेत बदल होईल, असा विरोधकांकडून प्रचार करण्यात आला. मात्र, ते फेक नेरेटिव्ह होते, असं जनतेच्या मनावर बिंबवण्यात आलं.

४)राहुल गांधींचा प्रचार ठरला निष्प्रभ
– लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान, धारावी प्रकल्पाचे पुनर्वसन अशा मुद्द्यांवर प्रचारात भर दिला. मात्र, त्यांच्या प्रचाराचा फारसा प्रभाव पडला नाही.

५)’एक है तो सैफ है’ घोषणा ठरली लोकप्रिय-
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांनी ‘एक तो सैफ है’ची घोषणा दिली. या घोषणेमुळे विरोधकांनी टीका केली. मात्र, जातींच्यावर मतांचे विभाजन टाळणे आणि विशिष्ट धर्माची भीती दाखवून कडवे हिंदुत्वाचा प्रचार करणे हे भाजपाचे उद्दिष्ट यशस्वी ठरले.

६)जाहीरनाम्यात फारसा फरक नाही-
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात फारसा फरक दिसून आला नाही. काँग्रेसनं सुरुवातीला लाडकी बहीण योजनेवर टीका केली. मात्र, जाहीरनाम्यात महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे काँग्रेसची द्विधावस्था दिसून आली.

७)महायुतीचा आक्रमक प्रचार-
महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात प्रचारासाठी सभा घेतल्या. प्रचारांचा धडाका सुरू असताना महायुतीकडून जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च करण्यात आला.

८)शिवसेनेत ( उद्धव ठाकरे) आक्रमकतेचा अभाव-
एकीकडं शिवसेनेचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हिंदुत्वासह राज्याच्या विकासाकरिता आक्रमकपणं भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेत (उद्धव ठाकरे) यांच्यात आक्रमकतेचा अभाव दिसून आला. ‘कटेंगे तो बटेंगे’, अशी भाजपाकडून घोषणा दिली जात असताना उद्धव ठाकरेंनी कडवे हिंदुत्व सोडल्याची टीका करण्यात आली. त्यावर शिवसेनेला (युबीटी) प्रभावीपणे बाजू मांडता आली नाही.

९)विरोधकांकडे मुद्द्यांचा अभाव-
सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना, बदलापूर येथील शाळकरी मुलींवर अत्याचार अशा विविध गंभीर मुद्द्यांसह शेतकरी प्रश्न, बेरोजगारी अशा मुद्द्यांवरून विरोधकांना सरकारला घेरता आलं नाही.

१०)महाविकास आघाडीत एकवाक्यतेचा अभाव-
महाविकास आघाडीत जागावाटप होताना काँग्रेस आणि शिवसेनेमधील (युबीटी) मतभेद समोर आले. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा? यावरून एकवाक्यता दिसून आली नाही. शिवसेनेनं (युबीटी) मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करावा, अशी मागणी केली. मात्र, शरद पवार आणि काँग्रेसनं त्याला नकार दिला. काँग्रेसकडून जास्त संख्याबळ असलेल्या पक्षाचा उमेदवार मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका घेण्यात आली.

११)डबल इंजिन सरकारला जनतेची पसंती-
केंद्र सरकारचा पाठिंबा असेल तर राज्याला पुरेसा निधी मिळतो, असा महायुती सरकारकडून प्रचार करण्यात आला. पूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती सरकार होते, असा महायुतीकडून प्रचार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडलेले प्रकल्प महायुतीनं सुरू केले, असा प्रचार करण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीकडून प्रभावीपणं उत्तर देण्यात आलं नाही.

१२)राष्ट्रवादी (एसपी) दुसऱ्या फळीतील नेत्यांचा अभाव-
राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात प्रचारसभा घेत महाविकास आघाडीच्या प्रचाराची चांगली बाजू सांभाळली. मात्र, राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा प्रचारादरम्यान अभाव दिसला.

Leave A Reply

Your email address will not be published.