मंत्री छगन भुजबळ यांच्या “या” मागणीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ कार्यवाही!

संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरणला "अ दर्जा" देण्याचा निर्णय

मुंबई / नाशिक: ६ सप्टेंबर २०२४ – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत राज्य सरकारने संत शिरोमणी श्री सावता महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरणला “अ वर्ग” दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत अरणच्या तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना देणारा हा निर्णय घेतल्याबद्दल छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.


यासंदर्भात मंत्री भुजबळ यांचा अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता, तसेच नुकतेच ४ सप्टेंबर रोजी देखील त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून श्री क्षेत्र अरणला “अ वर्ग” दर्जा देण्याची मागणी केली होती. या पत्राला तात्काळ प्रतिसाद देत राज्य सरकारने हा निर्णय घेतला. १९८५ साली आमच्या नाशिकच्या काही मंडळींनी सर्वप्रथम पुढाकार घेऊन या तीर्थक्षेत्री लोकसहभागातून सभामंडप उभारून अरणच्या विकासाचा श्रीगणेशा केला होता, याचा मनापासून अभिमान वाटत असल्याची भावना देखील भुजबळ यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

संत श्री सावता महाराज यांच्या कार्यामुळे पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील अरणभेंडी या तीर्थक्षेत्राला विशेष महत्व आहे. पंढरपूरला जाताना वर्षभर लक्षावधी भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतात. तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक श्री क्षेत्र अरण या तीर्थक्षेत्रास भेटी देतात. आता या तीर्थक्षेत्रास “अ दर्जा” देण्यात येणार असल्याने नक्कीच अरणच्या विकासाला खूप मोठी चालना मिळणार आहे.

या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि श्री सावता महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रसार करण्यासाठी आगामी काळातही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.