नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६९० कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी!
मंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई, नाशिक, दि. ३ सप्टेंबर :-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संस्थेचे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था इमारतीचे बांधकाम केंद्र सरकारच्या एचएससीसी संस्थेकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६९० कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रश्नाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार समीर भुजबळ,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आरोग्य विद्यान विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, आदींसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संस्थेचे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामाला शासनाने दि. २९.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या इमारतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल, आराखडे व अंदाजपत्रके हे सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेले आहेत. मात्र हे काम केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी (HSCC) कडून करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता. दिड वर्षाहून अधिक काळ होवुनही इमारत बांधकामाचे काम सुरु करण्याबाबत HSCC कडून कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती. त्यामुळे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात यावे अशी भुजबळ यांची मागणी होती.
सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या माध्यमातून नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्लब (मेगा पर्यटन संकुल) देशातील एकमेव सप्तशृंगी फनिक्युलर ट्रॉली, नाशिक विमानतळ इमारत इत्यादी नाशिकच्या वैभवात भर घालणारे विविध प्रकल्प निर्माण करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. तसेच आपल्या राज्याचे भूषण असलेली महाराष्ट्र सदन ही दिल्लीमधील वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत सुद्धा राज्यात नव्हे तर देशासाठी रोल मॉडेल होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करण्याची आवश्यकता होती. मात्र नाशिक येथील हे बांधकाम केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी (HSCC) कडून करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता.
मागील काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथील इमारत केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम कंपनी (HSCC) ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्य सरकारच्या विविध विभागाच्या इमारती बांधण्यासाठी आहे. या विभागाकडून अतिशय गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारती बांधल्या जातात. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा प्रमाणे नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम HSCC ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची मागणी होती.
त्यानुसार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ६९० कोटी रुपयांच्या सुधारित अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळणार आहे.