जनतेला आधार देणारा नामदार दिलीपराव वळसे पाटील यांचा जनसंवाद !
जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या निवेदनांचा केला स्वीकार...
मंचर, दि. १६. ०८. २०२४
मंचर येथे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील तर, त्यांचा जनता दरबार हा ठरलेलाच असतो. मागील काही दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाल्याने ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. दुखापतीतून सावरू लागल्यापासून ते आपल्या जनसंपर्क कार्यालय मंचर येथे येऊन जनता दरबार घेऊ लागले आहेत. आज त्यांनी जनसंपर्क कार्यालय, मंचर येथे जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला.
यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्यांच्या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जनतेच्या काही मागण्यांचा, समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला आहे. जनता दरबारात त्यांच्याकडे नागरिकांनी महसूल, कृषी, जिल्हा परिषद, नगरपालिका, विद्युत विभाशी संबंधित तक्रारी यावेळी करण्यात आल्या. सदर तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आपल्या नेत्याला झालेल्या दुखापतीची चौकशी करत नागिकांनी नामदार वळसे पाटलांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली. सर्वांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला वेळ देत नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात सुरु असलेल्या ‘लाडकी बहिण’ योजनेच्या बाबतीत त्यांनी महिलांशी संवाद साधला व त्यांना येत असलेल्या अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच लाडकी बहिण योजनेपासून कोणी वंचित राहणार नाही याची दखल घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून, सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.