राजगुरूनगर, दि. २४
मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांच्या वतीने खेड-आळंदिवासीयांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय तसेच समाजकार्यात अतुल देशमुख हे अग्रेसर असून, सध्या ते खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत.
त्यांनी राजगुरूनगरचे सरपंच, नायफड वाशेरे गटातून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या असून, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढवत जवळपास ५५ हजार मते मिळवली आहेत. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, येत्या काळात तेच महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील असे बोलले जात आहे.
खेड-आळंदीकरांसाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी पंढरपूर दर्शन यात्रेचे देखील आयोजन केले होत. त्यावेळी हजारो नागरिकांना त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडविले होते. पंढरपूरच्या यशस्वी यात्रेनंतर त्यांनी नागरिकांसाठी अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांना पाठविले असून, यामध्ये भाविकांच्या राहण्याची, जाण्या-येण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था देखील केली आहे. त्यांच्या या कार्याचे नागरिकांच्या वतीने सर्वत्र कौतुक होत आहे