१ रुपयात पिक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा छगन भुजबळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन
सन २०२३ -२४ अंतर्गत येवला तालुक्यात शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई
नाशिक,दि.२३ जुलै :-*येवला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपयांची, तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी शासनाने एक रुपयात पंतप्रधान पिक विमा योजना कार्यान्वित केली असून शेतकऱ्यांनी सन २०२४ – २५ खरीप हंगामासाठी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
सन २०२३ – २४ अंतर्गत आठ महसुली मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४६ कोटी रुपये नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. त्यातील ५ महसुली मंडळातील शेतकऱ्यांना सुमारे ९ कोटी रुपये नुकसान भरपाईचे वाटप देखील करण्यात आले आहे. तर निफाड तालुक्यात ७४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे.
यंदाच्या वर्षी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. सन २०२४ -२५ या खरीप हंगामासाठी तालुक्यातील ७४ हजार ६०० शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेतला असून या पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
पीक विमा काढण्यासाठी पीक पेरा नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर अर्ज सेतू कार्यालयाच्या माध्यमातून भरण्यात यावा तसेच अडचण असल्यास त्या त्या गावातील कृषी सहायकाशी संपर्क करावा.