आमदार सत्यजीत तांबे नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार; ‘या’ अभिनव उपक्रमाचे जनतेतून कौतुक !
नाशिक: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विविध पक्ष, नेतेमंडळी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अनेक वर्षांपासून जे लोक मतदान करत आहेत, त्यांना या प्रक्रियेविषयी बऱ्यापैकी माहिती असेल. पण, यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवीन मतदारांच्या मनात याबद्दल नक्कीच संभ्रम असू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते. महत्वाचे म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या देखील कोटींच्या घरात आहे. परंतु, अनेक तरुण मतदार मतदान प्रक्रियेविषयी पुरेशी माहिती नसल्याने मतदानाकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
अभ्यासू नेते अशी ओळख असलेले विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी गांभीर्याने हा मुद्दा पुढे आणला आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान का करायला हवं, याचं महत्त्व लोकांना समजवून सांगण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. ते आता युवकांच्या मनात मतदानाबद्दल असलेल्या शंका दूर करणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी एक भन्नाट उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून ते युवकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन करून मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणार आहेत. नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यातून या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली आहे.
ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. निवडणूक प्रक्रियेविषयी ज्यांना शंका आहेत, अशा नवमतदारांनी 7997006963 या नंबरवर मिस्डकॉल देऊन एक गुगल फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपले प्रश्न या फॉर्ममध्ये मांडायचे आहेत. तरुणांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन स्वतः सत्यजीत तांबे मार्गदर्शन करणार आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी भारत देशातील लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशातील लोकशाही आणि तेथील निवडणूक प्रक्रियेत नेमका काय फरक आहे? यावर देखील थोडक्यात प्रकाश टाकला आहे.