सामाजिक समता निर्माण करण्यात महात्मा फुलेंचं महत्त्वाचं योगदान- मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.११ एप्रिल :– छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती तर महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील विविध जंयती उत्सव मंडळांना भेटी देऊन क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना विनम्र अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी द्वारका येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पारंपारिक वेशभूषा करत नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे रथ व माहितीपर चित्ररथांचा सहभाग होता.
यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, अनिल जाधव, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, प्रा.बाळासाहेब पिंगळे, रमेश पिंगळे, शंकरराव पिंगळे, प्रा.अशोकराव सोनवणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, महेश हिरे, दामोधर मानकर,प्रथमेश गिते, समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, महिला अध्यक्ष योगिता आहेर,कविताताई कर्डक, डॉ.वसुधा कराड, पूजा आहेर, आशा भंदुरे, नयना बेंडकुळे, तेजश्री काठे, सुनीता पिंगळे, देवराम पवार, डॉ.जगन्नाथ तांदळे, कारभारी शिंदे, मोहन पिंगळे, रामदास तिडके, बाबुराव रायकर, विष्णू काकड, प्रमोद पालवे, अरुण थोरात, शंकर मोकळ, रवि हिरवे, शशी हिरवे,श्रीराम मंडळ, सचिन जगझाप,धनंजय थोरात, पोपटराव जेजुरकर, शुभम काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि, हजारो वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी सामाजिक समता निर्माण करण्यासाठी काम केलं. त्यामुळे त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना खरा महात्मा असल्याची पदवी बहाल केली. महात्मा फुले यांनी मांडलेले विचारांवर पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची मांडणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात हजारो वर्षापूर्वीच उच्चनिचतेच असलेल जोखड महात्मा फुले यांनी मोडून काढले. त्यांनी अंधश्रद्धा, सती प्रथा, धर्मभेद याला विरोध केला. स्त्री शिक्षणाच्या चळवळीत त्यांना तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे या सहकार्यांनी मोलाचे सहकार्य केले. या चळवळीत सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. तर लहूजी वस्ताद साळवे आणि रानाबा महार यांनी देखील योगदान दिल. महात्मा फुले ब्राम्हणांच्या विरोधात नाही तर ब्राह्मण्य वादाचा विरोध केला. महात्मा फुले यांचा हा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सर्व जाती जमातीतील बांधवांना सोबत घेऊन काम करायचं असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. शिवजयंतीची सुरवात त्यांनी केली. त्यांच्यावर सर्वात मोठा पोवाडा त्यांनी रचला. हा पोवाडा पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांनी समजासमोर मांडला. शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा मार्ग त्यांनी दाखविला. हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हव. तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी त्यांची शिकवण पुढे कायम ठेवण्यासाठी काम करायला हवे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले कि, बहुजन समाजासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाच्या माध्यातून बहुजन वर्गात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. सत्यशोधक समाजाची ही चळवळ छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेली. त्यांच्यानंतर हि चळवळ गणपतदादा मोरे, रावसाहेब थोरात, डॉ.डी.आर.भोसले, भास्करराव जाधव, अण्णासाहेब लठ्ठे पुढे नेली. तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह सामाजिक सेवकांनी आजही हि चळवळ आपल्या कामातून पुढे चालू ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या या मंडळांना भेटी…..
आरटीओ कॉर्नर येथील महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव मंडळ, मखमलाबाद येथील महात्मा जोतीराव फुले संयुक्त जयंती उत्सव मंडळ, क्रांतिसुर्य महात्मा फुले चौक,कामगार नगर येथील गुरु-शिष्य सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ,लक्ष्मी चाळ, द्वारका येथे महात्मा जोतीराव फुले मुख्य जयंती उत्सव मंडळ, जाणता राजा मैदान सातपूर येथील गुरु-शिष्य जयंती महोत्सव सातपूर जोती जन्मोत्सव मंडळ या मंडळांना मंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या.