नाशिक : जनतेला सहसा त्यांच्यामध्ये वावरणारा, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारा आणि दूरदृष्टी असणारा नेता आवडतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्यांना विशेष फरक पडत नाही. अनेकदा नागरिक केवळ उमेदवार पाहूनच त्यांचे मत देतात. जनतेला त्यांच्या प्रत्येक अडी-अडचणीत मदत करणारे युवा नेते सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेतृत्व लोकांना भावते. लोकांना ते आपल्यापैकीच एक वाटतात. शिवाय जनतेचे प्रश्न लगेच मार्गी लावण्यासाठी ते वेळोवेळी आवाज उठवत असतात. तसेच प्रत्येक प्रश्न तडीस नेण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्यासाठी ते शेवटपर्यंत त्या कामांचा पाठपुरावा करत असतात.
विशेष म्हणजे लोकांना त्यांचे विचार आणि काम करण्याची त्यांची पद्धतही पटते. त्यांची विचारसरणी आवडते. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार असे मोठे जिल्हे आणि त्यातील एकूण ५४ तालुके असणाऱ्या मतदारसंघात जवळ-जवळ प्रत्येकच वयोगटातील व्यक्ती त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने कनेक्टेड आहेत.
अशातच आता सत्यजीत यांनी काँग्रेसमध्ये परत यावे, अशी मागणी राज्यातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक जण तर आम्हाला काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे, असे म्हणत आहेत. तर काहींना त्यांना काँग्रेस पक्षात राहून मुखमंत्री झालेले पाहायचे आहे. जनता ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या विविध सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून सत्यजीत तांबे यांना पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन करत आहे. आता काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या मागणीला काय प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.