पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाशकात २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन उद्घाटने, लोकार्पण, भूमिपूजन यांसह विविध कार्यक्रमांची रेलचेल
केंद्रीय युवक कल्याण क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक येथे सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदान येथील दिमाखदार कार्यक्रमात पार पडले. यावेळी मोदींच्या हस्ते स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच विविध राज्यांच्या संघांकडून पथसंचलन आणि ‘विकसित भारत @2047- युवा के लिए – युवा का द्वारा’ या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. युवाशक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचे त्यांनी युवकांना आवाहन केले. विशेष म्हणजे त्यांनी राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मराठीतून संवाद साधत वंदन केले आणि ‘भारतीय नारी शक्तीचे प्रतीक’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. महाराष्ट्रभूमीत राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महानायक घडविला. याच भूमीत अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, रमाबाई आंबेडकर, चाफेकर बंधू, दादासाहेब पोतनीस यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्वे घडली, असेही उद्गार काढले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य केंद्रीय व राज्यातील मंत्रीगण आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.